Wednesday, June 3, 2015

हरिहर दुर्गभ्रमंती

किल्ले हरिहर दुर्गभ्रमंती- १ चित्तथरारक अनुभव
२०१४ सालचा शेवट हा मला एका कायम लक्ष्यात राहील अश्या दुर्गभ्रमंतीने करायचा होता . बराच विचार केल्यानंतर मी हरिहर किल्ल्याची निवड केली ,गेल्या महिन्यातच आम्ही भास्कर गडावर सह्याद्री स्वच्चता मोहीम राबविली होती , तेवा गडावर जातानाच हरिहर नजरेस पडला होता न कधी तो मी सर करणार असे झाले होते . या आधी सुद्धा हरिहर बद्दल बरेच ऐकून होतो पण जायचं काही जमत नवते . शेवटी ठरवलेच सरत्या वर्षाला निरोप हा हरिहर मोहीम फत्ते करून करायचा . २७-२८ असे २ दिवस मला सुट्टी होती . जायचे नियोजन आधीपासून करून ठेवले होते. २६ ला रात्रीच मी नाशिक गाठले , रात्र मित्राकडे काढली आणि मी अन माझा मित्र राजेश अहिरे दोघी बायिक ने हरिहर जायला सकाळी ९ ला निघालो . माझ्यासोबत अजून १ मित्र दीपक भाऊ येणार होते ,आम्ही निरगुडपाडा हे पायथ्याशी असलेले गाव आहे तेथून आपण हरिहर आणि भास्कर गडासाठी जाऊ शकतो .
नाशिक रोड वरून बाहेर पडलो आणि त्रंबकेश्वर ला जाणार्या रोड ने प्रवास सुरु झाला . थंडी कडाक्याची होती. वाटेत थोडे पुढे आल्यावर लगेच अंजनेरी किल्ला रस्त्याच्या डाव्या बाजूस नजरेस पडतो . १ तासाच्या प्रवासानंतर आम्ही हरिहर च्या पायथ्याशी असलेल्या पाड्यावर येउन पोचलो,त्याचे नाव कोटमपाडा . माझे मित्र दीपक तिकडे लगेचच पोचले . तिथे असलेल्या १ झोपडीत आम्ही आमच्या गाड्या लावल्या अन खरा हरिहर चा प्रवास चालू झाला . वातेच जात असताना भात शेती दिसून येत होती ,इथल्या आदिवासी लोकांचे उतपन्नाचे हे प्रमुख साधन . अगदी साधी आणि सरळ जीवनशैली . थोडा वेळ लहानपणी मामच्या गावी काढलेले दिवस आठवू लागले . थोडे वर चढाई केल्यावर हरिहर समोर दिसून पडला ,लगेचच मी माझा कॅमेरा काढला अन केली हरिहर ला कॅमेर्यात साठवायला सुरवात ,मी माझ सर्वस्व विसरून गेलो . वर चढाई करत असतांना दीपक त्याचे हरिहर चे वेग वेगळे किस्से सांगत होता ,त्याची हि हरिहर ची ५वी वेळ होती . मी सगळे ऐकत होतो आणि उत्तुकता शिगेला पोचली होती

शेवटी आम्ही पोचलो हरिहर च्या पायथ्याशी कातळात कोरलेल्या हरिहर च्या पायर्या च्या मी अगदी प्रेमात पडलो होतो , कधी एकदाचा वर पायर्या चढून जाणार असे झाले होते ,तत्पूर्वी मी माझ्या कॅमेर्यात त्या पायर्याना साठवत होतो . अगदी सरळ आणि उभ्या दिसणाऱ्या त्या पायर्या पाहून मनात धडकी सुद्धा भरली होती . शिवनामाचा जयघोष करून पायर्या चढायला सुरुवात केली न काही वेळातच वर प्रवेश द्वाराजवळ जाऊन पोचलो . मागे वळून बघतच नजरा काही वेगळाच होता . लगेचच आम्ही पुढे जाऊन परत ३०-४० उभ्या पायर्या अन भयानक अश्या वाटणाऱ्या पायर्या दिसल्या , त्या चढायला एकदम हळू सुरुवात केली ,मागे वळून बघतच चक्कर येईल असे भयंकर असे दृश्य दिसत होते . शेवटी वर पोचलो , हरिहर वर बनविलेया पाण्याच्या टाक्या अन तलाव दिसून आला ,त्यात थंड पाणी होते . पुढे थोडे सरकल्यावर लगेचच समोर घुमटाकार माथा असलेली दगडी ३० फूट लांब व १२ फूटरुंद अशी दगडी कोठी दिसली.. कोठीचे  प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या  खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख होता.. इतिहास काळातील हीदारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव शाबूत असलेली इमारत आहे. जोरात भूक लागली होती तिकडेच आम्ही जेवणावर ताव मारला आणि अर्धा तास विश्रांती केली . सुखाचा परमोच्च आनंद काय असतो याची अनुभूती येत होती . दुपारचे ३ वाजले होते तरी थंडगार वारा वाहत होता .
हरिहर चा उंच माथा ज्याला आपण बालेकिल्ला म्हणू शकतो तो आम्ही शेवटी चढलो आणि तिथून दिसणारा नयनरम्य दृश्य मी या आधी कधीच पहिले नवतो ,मी स्तब्ध होऊन दूरपर्यंत जाईल तिकडे नजर टाकण्याचा प्रयत्न करत होतो . थंडगार हवा आणि अथांग असा सह्याद्री डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न मी करत होतो . शेवटी आम्ही १ तास तिथे घालविला ,इच्छा नसताना सुद्धा आम्हाला परतावे लागले कारण अंधार पडत होता आणि आम्हाला पायथ्याशी परत जाऊन नाशिक साठी निघायचे होते . शेवटी जड अंतकरणाने आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली ,त्या हरिहर च्या पायर्या अगदी काळजीपूर्वक खाली उतरत होतो अन उतरत असताना मावळतीचा सूर्य हा दिसून येत होता . १ तासात आम्ही खाली पायथ्याशी आलो . अन परत हरिहर कडे बघून आम्ही परतीचा प्रवास चालू केला . पण माझे मन अजूनही हरिहर वर भटकत आहे अन मी हरिहर च्या प्रेमात कायमचा पडलो आहे
 किल्ल्याची सविस्तर माहिती खाली देत आहे .

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग     डोंगररांग: त्र्यंबकेश्वर
जिल्हा : नाशिक     श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.

नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्‍या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.


पहाण्याची ठिकाणे :
कोणत्याही वाटेने किल्ल्यावर येतांना आपण किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचतो. या कातळात पायर्‍या खोदलेल्या आहेत आणि जागोजागी आधारासाठी खोबण्या सुद्धा केलेल्या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर समोरच एक दरवाजा लागतो. पुढे डोंगरांची एक कपार आहे. येथून चालत थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काही पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी पोहोचतो. या द्वारातून आत शिरल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. किल्ल्याचे पठार तसे निमुळतेच आहे. मध्येच एक उंचवटा आलेला आहे.

पायवाटेने थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे खाली कड्यात एक गुप्त दरवाजा आढळतो, मात्र तेथे जाण्याचा मार्ग सद्यस्तिथीला अस्तित्वात नाही. थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर आहे. समोरच पाण्याचा मोठा तलाव आहे. तलावातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर एक इमारत आढळते. या इमारतीत दोन खोल्या आहेत. या इमारतीमध्ये १० ते १२ जणांना राहता येते. इमारतीच्या एका बाजूला ५ पाण्याची टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. गडाचा घेरा फारच निमुळता असल्याने एक तासात गड फेरी आटोपता येते.

पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.

१)मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),

२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)

तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहरगड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.

३. कसारा किंवा नाशिक मार्गे :-
कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. हरिहरच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत.

४. इगतपूरी - त्र्यंबकेश्वर - खोडाळा मार्गे :-
निरगुडपाडा गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपूरी-त्र्यंबकेश्वर-खोडाळा या बसने या गावात उतरता येते. या गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर हर्षेवाडी नावाची वाडी लागते. या वाडीतून या किल्ल्यावर पोहोचण्यास १ तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी इमारत आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
हर्षेवाडी मार्गे १ तास तर निरगुडपाडा मार्गे २ तास लागतात.

इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहर गड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.





No comments:

Post a Comment