Wednesday, November 4, 2015

दूर्लक्षित किल्ले सुतोंडा

दूर्लक्षित  किल्ले सुतोंडा 
हा एक लहान किल्ला जो
नायगाव चा किल्ला या नावाने सुद्धा ओळखला जातो . दि १६ ऑगस्ट ला मी आणि माझा मित्र मंगेश बाविस्कर  पहाटे ५ ला बाईक ने जळगाव वरून निघालो . जळगाव वरून सुतोंदा अंतर अंदाजे २ तास आहे जवळपास ८० किमी . जळगाव वरून पाचोरा होऊन पुढे बनोटी या गावात पोचलो कि सुतोंडा  किल्ला दिसून येतो . किल्ला चढाई ला सोपा आहे . अंदाजे ४५  मिनिट लागतात. बनोटी गावातून पुढे सरकल्यावर एका डोंगरावर  किल्ल्याचा बुरुज दिसून येतो,किल्ल्यावर जातांना  थोडा वळसा घालून जावे लागते . वर चढून गेल्यावर एक भलामोठा खडक फोडून त्याच्या डाव्या बाजूला दगडात कोरलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसून येते. दरवाज्यातून आत गेल्यावर भुयारी मार्गाने आपण किल्ल्यावर जाऊन पोहचतो. 

येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे ५० फूट लांब , २० फूट रूंद व २० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे १७०० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. या खाचेच्या (खिंडीच्या) दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज व तटबंदी होती, तर तिसर्‍या बाजूला खोल दरी. अरुंद पायर्‍यांवरुन शत्रु ह्या खिंडीत आल्यावर दोन्ही बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागिल बाजूस असलेल्या अरुंद पायर्‍यांमुळे शत्रुची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत. 

पुढे वर चढून गेल्यावर चारही बाजूने पाण्याच्या टाक्यांचे आणि  लेणींचे थर आहेत व या लेणींचे थरांचाच हा डोंगर आहे. प्रत्येक टाक्याच्या वरची छताची बाजू ही सपाट व मोकळी जागा आढळते. वर उंच डोंगराचा सुळका दिसून येतात . वर टोकांवर दगड रचून केलेल्या भिंती आहेत. किल्ल्यावर असंख्य पिण्याच्या पाण्याच्य टाक्या आहेत आणि त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. किल्ल्यावर बांधकाम केलेल्या इमारतीचे अवशेष सुद्धा दिसून येतात . किल्ल्याच्या उत्तरेस एक चोर दरवाजा दिसून येतो. ज्यामधून तटबंदी पार करून किल्ल्याच्या थेट आत किवा बाहेर प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या तटबंदी ला पकडून फिरत गेल्यास एक टेहाळणी भक्कम बुरुज दिसून येतो. किल्ल्यावर सध्यातरी एवढेच अवशेष दिसून येतात . २-३ तासात   किल्ला आरामात बघून होतो . या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे अखंड दगडात तयार केलेल्या पाण्याच्या टाक्या आणि दगडी भुयारीप्रवेशद्वार. आज इतके वर्ष होऊन सुद्धा हा किल्ला अजूनही आपले वेगळेपण टिकवून आहे पण काहीसा दुर्लक्षित असा हा किल्ला आहे 
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही . पायथ्याशी असलेल्या बनोटी गावात राहून आपण मुक्काम करू शकतो. पिण्याचे पाणी किल्ल्यावर मुबलक आहे. बारही  महिने किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्या फुल असतात . 

किल्ल्यावर जाण्याचा मार्ग 
औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडहून एक रस्ता ३१ किमी वरील घाटनांद्रा गावाकडे जातो. घाटनांद्राहून १३ किमीवर तिडका नावच गाव आहे. हे गाव फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर आहे. तिडका गावातून ३ किमीवर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

असा हा किल्ला प्रत्येक इतिहास प्रेमीने एकदा तरी भेट देण्यासारखा आहे .

अमोल देशमुख
जळगाव









No comments:

Post a Comment