खान्देशातील विशेषकरून
पूर्व खान्देशातील ( जळगाव जिल्ह्यातील ) किल्ल्यांवर फारसे कोणी लिहिलेले
नाही.राजदेहेर,पारोळा व अमळनेरवरच फारच थोडे लिहिले गेले.त्यामुळे जिल्ह्यातील
माहिती वाचकांना नाही.
जिल्ह्यात जे काही किल्ले
आहेत ते एकतर गवळीराजकालीन (आभिरकालीन),फारुकीकालीन व पेशव्यांच्या उत्तरकाळातील
आहेत. त्यामुळे बहमनी , आदिलशाही व निजामशाहीत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जसे
मोठाले किल्ले बांधले गेले आहेत तसे जळगाव जिल्ह्यात नाहीत. जिल्ह्यात एकूण २७-२८
किल्ले-गढ्या आहेत. यांच्यावर घडामोडी घडल्याच नाहीत, असे नाही. यातील १२
किल्ल्यांवर तर ब्रीतीशांशी चकमकी झालेल्या आहेत.
इ.स. १८१८ मध्ये ब्रिग्ज
याला खानदेशाचा कमिशनर नेमल्यानंतर त्याने खानदेशाचा सर्व भाग आपल्या पायाखाली
घातला. त्याने “दि लाईफ एंड कॅन्डीशन ऑफ खान्देश पिपल” या नावाचा एक मोठा अहवाल
तयार केला आणि तो मुंबई च्या गोवेर्नेर ला पाठविला. यात ब्रिग्ज लिहितो कि खान्देश
चा इतिहास हा फारसा लिखित स्वरुपात उपलब्द नाही.
छत्रपती शिवाजी
महाराजांच्या काळात किल्ल्यांना महत्व आले;पण खान्देशमधील सर्व गिरिदुर्ग हे यादव
किवा यादवपूर्वकालीन आहेत.बहामनी काळात हे किल्ले आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी बराच
संघर्ष खान्देश भागात झालेला आपणास दिसून येतो. या संघर्षाचे काही उल्लेख मुसलमानी
इतिहासकारांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथात आपणास आढळतात; परुंतू दुर्दैवाने या गोष्टींचे
फारसे संशोधन झाले नाही.धुळे,जळगाव,नंदुरबार जिल्ह्यातील किल्ले,गढ्या आणि तेथील
इतिहास हा सतत उपेक्षितच राहिला.
खान्देशातीत विशेषता
जळगाव जिल्ह्यात असलेल्या किल्ल्यांमध्ये प्राचीन असा किल्ला म्हणजे चौगाव चा
किल्ला. दक्षिणेतून मध्यप्रदेशात ( नेमाडत ) जाणार्या मार्गावरील हा किल्ला
संरक्षणाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा तर आहेच;परंतु उत्तर,मध्यप्रांतातून
दक्षिणेतील सुरत, भडोच बंदरातून भारताबाहेर निर्यात होणार्या मालासाठी बाजारपेठ
म्हणूनही चौगावाचे महत्व वर्णन केले आहे.
गडवाट परिवाराच्या वतीने
यंदा राज्यभरात विभागावर किल्ल्यांवर वृक्षारोपण आयोजित केले होते. जळगाव विभागात
दुर्लक्षित अश्या चौगाव किल्ल्याची माहिती मिळाली आणि लगेचच किल्ल्याला जायचं ठरलं.
किल्ल्याच्या पायथ्याला
चौगाव वसलेले आहे . जळगाव जील्यातील चोपडा तालुक्यात वायव्येस ११ किमी लांब चौगाव
येत.या गावाजवळ सातपुडा पर्वत येतो,पर्वताच्या दक्षिणेकडे आलेल्या एका सुळक्यावर
गवळी राजवटीतील प्राचीन किल्ला आहे. तो मध्य प्रदेशात ( नेमाडत ) जाणर्या
अतिप्राचीन भिराट घाट या डोंगरी मार्गावर आहे. गडाच्या पायथ्याशी तीन नद्या वा
नाले एकत्र येऊन मिळतात.तेथे प्राचीन महादेवाचे मंदिर होते आता त्याचा जीर्णोद्धार
करण्यात आला आहे. या मंदिराजवळ सपाट जागेवर दगड विटांचे ढिगारे दिसतात.पूर्वीच्या काळी
बहुतेक किल्ल्यांच्या खाली असे बाजारहाटाचे केंद्र आढळून येई.गडाच्या उजव्या व
डाव्या बाजूस मोठ्या चीपात्या,बांदरा बल्ल्या ,लेभाग डोंगर ,काली टेकडी , मास्तरना
बल्ल्या ( अहिराणी भाषेत बल्ल्या म्हणजे डोंगर )हे सातपुडा रांगेतील डोंगर
आहेत.किल्ल्यास दोन दरवाजे आहेत. एक दक्षिणेकडे गडावर चढतांना दक्षिण दरवाजा चटकन लक्षात
येणार नाही अश्या रीतीने तो बांधला आहे. हा दरवाजा अजून शाबूत आहे. दरवाज्याच्या बाहेरील
बाजूस संरक्षक तटभिंतीत एक मोठे खोदीव टाके आहे .हे पाण्याचे टाके पुरातन लेणे
असावे. लेण्यात एका रांगेत तीन स्तंभ अश्या समोरील दोन स्तंभावल्या दिसतात. अंधारामुळे
आतील काहीच दिसत नसल्यामुळे आणखी किती स्तंभ मागे आहेत हे समजू शकत नाही. या
स्तंभांनी छतास आधार दिलेला आहे .
गडावर दोन वाद्यांचे
अवशेष आहेत. दक्षिण प्रवेशद्वारातून डाव्या बाजूस एका वाड्याचे चौथरे दिसतात.हा
वाडा डोंगराच्या कडेवर असल्यामुळे येथून खालील प्रदेशाचे दृष्य मनोहारी दिसते. वाड्यास
लागून एक हौद व एका देवीच्या देवळाचा चौथरा आहे . या वाड्याच्या बाजूने पुढे
गेल्यास चार खोदीव टाक्यांचा समूह दिसून येतो. या टाक्यांमध्ये पाणी काठोकाठ
भरलेले असते. त्यामुळे गडावरील वस्ती व शिबंदिस पाणी मुबलक प्रमाणात मिळत असावे .टाक्यांच्या
पुढे गेल्यावर एक प्रशस्त ( सुमारे ५० मी लांब x २५ मी रुंद ) असा एक वाडा आहे .त्यास
गवळीवाडा असे म्हणतात . वाड्याच्या चहुबाजूने भिंती शाबूत असून वरचे छत तेवढे आज
शिल्लक नाही. छताच्या या भिंतीच्या अगदी वर हवा ये जा करण्यासाठी केलेली सोय
वाखाणण्यासारखी आहे. वाड्याचे प्रवेशद्वार विचित्र आहे.समोरून वाड्यातील काहीही
दिसणार नाही, अशी त्याची रचना आहे. वाड्यासमोरील मोकळ्या जागेत १९७७ मध्ये ६ फुट
लांबीच्या चार जुन्या तोफा सापडल्या असून त्या सध्या चोपडा तहसीलदार कचेरीच्या
आवारात ठेवण्यात आल्या आहेत. वाड्याच्या उत्तरेला उत्तर दरवाजा दिसून येतो .पडक्या
अवस्थेत असला तरी बर्यापैकी शाबूत आहे .
किल्ल्यातील वस्तूंचा
संशोधनात्मक अभ्यास केल्यास बर्याच गोष्टीचा आणि अपरिचित इतिहासावर प्रकाश पडू
शकतो .
किल्ला चढायला सोपा असून
पायथ्यापासून चढाई साठी ४० मिनिट लागतात. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय
नसल्यामुळे सोबत मुबलक पाणी असणे आवश्यक आहे.
किल्ल्याला भेट द्यायची
असल्यास जळगाव वरून चोपडा मार्गे चौगाव ला येऊ शकतात. पायथ्याला असलेल्या गावात
जेवणाची सोय होऊ शकते. किल्ला पूर्ण बघायला २ ३ तास वेळ लागतो.
अश्या या अपरिचित
किल्ल्यास अभ्यासक मंडळीनी नक्की भेट द्यायला हवी.
अमोल देशमुख










No comments:
Post a Comment