Wednesday, November 4, 2015

किल्ले कंक्राळा

सालाबादाप्रमाणे दर वर्षी दसर्याचे तोरण यावर्षी सुद्धा बांधून सणांची सुरुवात करण्याचे ठरविले . गडवाट परिवारातर्फे दरवर्षी सह्याद्री मधील दुर्गांवर महाराष्ट्रातील विविध भागांमधून  तोरण बांधायचा उपक्रम आयोजित करण्यात येतो  त्याअंतर्गत यंदा जळगाव-धुळे विभाग मिळून किल्ले कंक्राळा येथे तोरण बांधायचे आम्ही ठरविले. दसर्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या मित्र मंगेश बाविस्कर याच्या घरी धुळ्यात मुक्काम ठोकला. दुसर्या दिवशी पहाटेच निघायचे ठरविले होते. तसे नियोजन रात्रीच करून ठेवले. तोरण बांधायला लागणारे झेंडूची फुल सुई दोरा सुतळी सगळ काही आधीच ब्याग मधे भरून घेतले. सकाळी पहाटेच ५.३० ला मंगेश आणि मी धुळे-सुरत हायवे ने मालेगाव साठी निघालो. मालेगाव म्हटले म्हणजे नाशिक जिल्हा. मालेगाव च्या पश्चिम दिशेला सह्याद्री मधील गाळणा,पिसोळ,डेरमाळ,किंक्राळा सारखे अनेक किल्ले आहेत. यांना दुर्लक्षितच म्हणता येईल. 
धुळ्यामधून किल्ले कंक्राळा येथे जायचे असल्यास थेट मालेगाव रस्ता गाठावा. मालेगाव च्या अलीकडेच १३ किलोमीटर ला कंक्राळा नावाचे गाव आहे. बहुदा किल्ल्याच्या नावावरून गावाचे नाव सुद्धा किंक्राळा पडले असावे. नाशिक मधून या किल्ल्यासाठी यायचे असल्यास मालेगाव-गाळणा रस्त्यावर करंजगव्हाण नावाचे गाव लागते. मालेगाव पासून हे गाव २५ किमी आहे. करंजगव्हाण गावापासून एक रस्ता डावीकडे कंक्राळा या गावासाठी निघतो. करंजगव्हाण पासून कंक्राळा गाव ६ किमी वर आहे . समोरच गेल्यावर गावाच्या मागील बाजून किल्ला दिसून येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी गावातूनच जावे लागते. 
किल्ला चढाई साठी सोपा आहे. पायथ्यापासून किल्ल्याच्या प्रवेशद्वार पर्यंत जाण्यास ४५ मिनिट लागतात. चढाई मार्गात बरीच दाट झाडझुडप लागलीत. त्यामुळे नेमका रस्ता कळून येत नव्हता. थोडे वर चढल्यावर किल्ल्याची पडझड झालेली तटबंदी दिसून आली. मग लगेचच एका दमात किल्ल्याच्या प्रवेशद्वार जवळ पोहचलो. प्रवेशद्वार चे सुद्धा नुकसान झाले आहे  आणि तिथे बरीच शी झाड आली आहेत. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही लगेच किल्ल्यावर जाऊन पोहचलो . वेळ वाया न घालविता किल्ला फिरायला सुरुवात केली . किल्ल्यावर तसे काहीच अवशेष दिसून येत नाहीत. उजव्या बाजूला वर गेल्यावर महादेव ची पिंड , सोबत नंदी आणि हनुमानाची शेंदूर फसलेली दिसून येते. बहुतेक किल्ल्यावर शंकराचे मंदिर असावे. महादेवाची पिंड आणि नंदी सुबक आहेत. मनुष्यवस्ती आणि गर्दी पासून दूर असलेल्या या देवांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. वाटले कि हेच खरे सुखी देवता. ना इथे कुणाचा मानपान ना  नवसाच्या रांगा . पुढे उजव्या बाजूला वर चढून गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर येउन पोहचलो. तिकडे जाताच समोरच भल्यामोठ्या पिण्याच्या पाण्याच्या ५ टाक्या दिसून येतात. यातल्या २ टाक्या या आकारमानाने खूप मोठ्या आहेत. तिथे थोडावेळ थांबून आम्ही किल्ल्याच्या डाव्या बाजूस निघालो. डाव्या बाजूस गेल्यावर किल्ल्याची पडलेली तटबंदी दिसून येते . उजव्या बाजूला किल्ल्याला वळसा मारला कि खालच्या बाजूला किल्ल्याचे प्र वेश्द्वार दिसून येते आणि समोरच्या बसून डोगरात कोरलेल्या २ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या दिसून येतात. गावकर्यांनी चुन्याच्या खुणा त्या टाक्यांच्या बाजून करून ठेवल्या आहेत. गावकरी सांगतात कि तेथील पाण्याची पातली कधीच कमी होत नाही आणि बारमाही थंडगार पिण्याचे पाणी तेथे असते. किल्ला उतरताना त्या टाक्यांना भेट देण्याचे आम्ही ठरविले . नंतर आम्ही परत खाली किल्ल्याच्या प्रवेशद्वार जवळ आलो. आणि किल्ल्याला बांधायला लागणारे तोरण बांधायला सुरुवात केली . तोरण बांधून झाल्यावर प्रवेशद्वार समोर आलेली झाड झुडपे मंगेश ने तोडली आणि तोरण बांधायला जागा मोकळी झाली. तोरण बांधून झाल्यावर शिवनामाचा जयघोष करून मंगेश ने गारद दिली . कॅमेरा मध्ये फोटो काढून आठवणी कैद केल्या. थोडावेळ आराम करून किल्ला उतरायला सुरुवात केली. किल्ला उतरत असतांना त्या पिण्याच्या टाक्या दिसतात तिथे आम्ही गेलो. टाक्यांमधील पाण्याने खरच खूप सुखद अनुभव दिला. थंडगार पाण्याने मन तृप्त झाले . थोडा वेळ तेथे विसावा घेऊन गड पुन्हा एकदा निरखून काढला आणि आम्ही गड उतरायला लागलो. 
असा हा उर्लाक्षित आणि उपेक्षित असा किंक्राला किल्ला दसरा तोरण निमीन त्ताने कायम आठवणीत राहील 
अमोल देशमुख
जळगाव
9970398616











दूर्लक्षित किल्ले सुतोंडा

दूर्लक्षित  किल्ले सुतोंडा 
हा एक लहान किल्ला जो
नायगाव चा किल्ला या नावाने सुद्धा ओळखला जातो . दि १६ ऑगस्ट ला मी आणि माझा मित्र मंगेश बाविस्कर  पहाटे ५ ला बाईक ने जळगाव वरून निघालो . जळगाव वरून सुतोंदा अंतर अंदाजे २ तास आहे जवळपास ८० किमी . जळगाव वरून पाचोरा होऊन पुढे बनोटी या गावात पोचलो कि सुतोंडा  किल्ला दिसून येतो . किल्ला चढाई ला सोपा आहे . अंदाजे ४५  मिनिट लागतात. बनोटी गावातून पुढे सरकल्यावर एका डोंगरावर  किल्ल्याचा बुरुज दिसून येतो,किल्ल्यावर जातांना  थोडा वळसा घालून जावे लागते . वर चढून गेल्यावर एक भलामोठा खडक फोडून त्याच्या डाव्या बाजूला दगडात कोरलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसून येते. दरवाज्यातून आत गेल्यावर भुयारी मार्गाने आपण किल्ल्यावर जाऊन पोहचतो. 

येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे ५० फूट लांब , २० फूट रूंद व २० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे १७०० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. या खाचेच्या (खिंडीच्या) दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज व तटबंदी होती, तर तिसर्‍या बाजूला खोल दरी. अरुंद पायर्‍यांवरुन शत्रु ह्या खिंडीत आल्यावर दोन्ही बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागिल बाजूस असलेल्या अरुंद पायर्‍यांमुळे शत्रुची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत. 

पुढे वर चढून गेल्यावर चारही बाजूने पाण्याच्या टाक्यांचे आणि  लेणींचे थर आहेत व या लेणींचे थरांचाच हा डोंगर आहे. प्रत्येक टाक्याच्या वरची छताची बाजू ही सपाट व मोकळी जागा आढळते. वर उंच डोंगराचा सुळका दिसून येतात . वर टोकांवर दगड रचून केलेल्या भिंती आहेत. किल्ल्यावर असंख्य पिण्याच्या पाण्याच्य टाक्या आहेत आणि त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. किल्ल्यावर बांधकाम केलेल्या इमारतीचे अवशेष सुद्धा दिसून येतात . किल्ल्याच्या उत्तरेस एक चोर दरवाजा दिसून येतो. ज्यामधून तटबंदी पार करून किल्ल्याच्या थेट आत किवा बाहेर प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या तटबंदी ला पकडून फिरत गेल्यास एक टेहाळणी भक्कम बुरुज दिसून येतो. किल्ल्यावर सध्यातरी एवढेच अवशेष दिसून येतात . २-३ तासात   किल्ला आरामात बघून होतो . या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे अखंड दगडात तयार केलेल्या पाण्याच्या टाक्या आणि दगडी भुयारीप्रवेशद्वार. आज इतके वर्ष होऊन सुद्धा हा किल्ला अजूनही आपले वेगळेपण टिकवून आहे पण काहीसा दुर्लक्षित असा हा किल्ला आहे 
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही . पायथ्याशी असलेल्या बनोटी गावात राहून आपण मुक्काम करू शकतो. पिण्याचे पाणी किल्ल्यावर मुबलक आहे. बारही  महिने किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्या फुल असतात . 

किल्ल्यावर जाण्याचा मार्ग 
औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडहून एक रस्ता ३१ किमी वरील घाटनांद्रा गावाकडे जातो. घाटनांद्राहून १३ किमीवर तिडका नावच गाव आहे. हे गाव फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर आहे. तिडका गावातून ३ किमीवर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

असा हा किल्ला प्रत्येक इतिहास प्रेमीने एकदा तरी भेट देण्यासारखा आहे .

अमोल देशमुख
जळगाव